असे जगावे माणसाने
असे जगावे माणसाने
आयुष्याची सांजरात तुझ्या
सत्कर्माच्या चांदण्यात झुलावी
प्रेरणा होऊनी नवयुगाची
विश्वात नित्य दरवळावी...१
असे जगावे वृक्षांपरी
निरपेक्षता जागवूनी मनी
आसरा होऊनही कुणाचा
जावे क्षणात तू विसरुनी...२
भेदावे भेद जे इथले
धरा साहे भार जशी
झोकून दे जीवननौका
झुंझण्यास वादळांशी... ३
दिलखोल कर तू प्रीती
जो यावा विरुन जावा
स्मित गाली सुधा माधुरी
क्षण त्याचा भिजून जावा...४
ऊरी नकोच तर-तम व्याधी
ना क्षोभ, दंभ, वासना
हृदयगाभारी चैतन्य उरावे
असे धन्य करी जीवना...५
तू निमिषातून अस्मानी
तूफान भरारी घ्यावी
अथांग नभातून तुजवर
ताऱ्यांची उधळण व्हावी...६
'मी' जाळून प्रकाश देई
दात्याचे तू 'हात' घ्यावे
श्वासांचे अविरत जाणे येणे
केवळ यास का जीवन म्हणावे?... ७