तुझ्या प्रीतीत
तुझ्या प्रीतीत
देह भान हरवले तुझ्या धुंदीत
रोमरोमी शहारले तुझ्या प्रीतीत।।ध्रु।।
तुझ्या नजरेचे इशारे गंधाळले
तुझे स्पर्श रेशमी मनी उधाणले
तन मन हरवूनी भान बेभानले
येई झुळूक घेऊन प्रीतीचे गीत
रोमरोमी शहारले तुझ्या प्रीतीत..।।१।।
जाणून घे सख्या तू भाव मनातले
बघ नजरेत माझ्या बिंब तुझ्यातले
अनमोल स्वप्न सजे माझ्या तुझ्यातले
तुझ्या येण्याने हे मन न्हाले कैफात
रोमरोमी शहारले तुझ्या प्रीतीत..।।२।।
दवथेंबही देहात दाह पेटवते
मन मनाचे ऐके ना तुला खुणवते
अशी कशी ही स्थिती चाहूल ऐकते
निलाजरे मन सैरावैरा नवनीत
रोमरोमी शहारले तुझ्या प्रीतीत..।।३।।
मोहरला मधूमास सोडूनीया धीर
धुंद रेखलेली आज सय देहभर
घेई मनात उखाणे हळद दुपार
गंध बेहोषी माझ्या हाताच्या मेंदीत
रोमरोमी शहारले तुझ्या प्रीतीत..।।४।।

