शिक्षणाची खरी आद्य दैवत
शिक्षणाची खरी आद्य दैवत
स्त्री शक्ती शिक्षणाचा जागर
स्फूर्ती नायिका त्यागमूर्ती सावित्रीचा
वाचा फोडली जातीभेदाची
अन्यायग्रस्त रुढीतल्या महिलांचा...
स्त्रीशिक्षणाची प्रणेती
विद्येची जननी दिव्य ज्योती
स्रीजन्मास उजेड दाखवण्यास
पेटवली शक्तीने ज्ञानज्योती.....
छळले जातीयवादाने
म्हणे धर्म तिने बुडविला
शेण माती थुंकीचा मारा
अंगावर सावित्रीच्या उडविला....
ना थकली ना खचली
बीजे रोवली स्त्रीशिक्षणाची
झटून रातंदिन स्वकष्टाने
जातिभेद दुःखीतांच्या स्वातंत्र्याची....
काळीज तिचे तडफडे फार
उतरवली गंगोत्री धरेवर अक्षरांनी
अस्पृश्यांना दिला आत्मसन्मान
देह झिजवला हाल अपेष्टांनी...
नसे अस्तित्व चूल मूल पदरी
लढली ज्योतिबाच्या सहाय्याने
बालविवाह रुढी परंपरेला
सतीची प्रथा नष्ट केली पुनर्विवाहाने...
माणूस वागतो पशु बुद्धीने
स्वर्ग-नरकाच्या त्याच्या कल्पना
मानतो अविचार विज्ञान युगात
बुद्धी असूनही दैवी ध्यास मना...
अडाणी बायांची एक मुठ बनवली
रात्रीच्या काढून शाळा युक्तीने
पेटवल्या अंधकारातून असंख्य वाती
प्रकाशमय वज्रमूठ क्रांतीज्योतीने....
ज्ञानाची पेटवली कष्टमय वात
शिक्षणाच्या विरोधी वादळवाऱ्यात
निवांत झाली स्त्री जात
सावित्री माय झटली दिनरात....
मानवाची झाली बुद्धी खाक
खरी सावित्री दडवतो धर्माआड
विसरला त्याग तिचा हाय रे दुर्दैवा
शिक्षणाची दैवत सावित्री ठेवी अंधश्रद्धा आड.....
स्त्री मना उसळवा विचार लाट
सावित्रीच्या त्याग प्रेरणेची
जागृत हो खरी हृदयातून तू
प्रतिमा ठेव ज्ञानज्योति सावित्रीची......