शेतकऱ्याचे जिणे
शेतकऱ्याचे जिणे
किती साठते भेगात
सारे रगात श्रमाचे
नांगरून आयुष्याला
देई अन्न तो त्यागाचे...
काळ्या शेतात राबतो
पीक अंकुर उगण्या,
आशा धरून मनाशी
करी नभा विनवण्या...
स्वप्न हिरव्या रानाचे
करी कष्टाने साकार,
मोल ना जाणता, कुठे
भाव देई सरकार...
थेंब न थेंब घामाचा
रानामध्ये गाळतोय
पीक मोती बहरण्या
रातंदिन खपतोय...
हीन दिन हो जीवन
जगासाठी पोशिंद्याचे
वाट पाहे तो बळीची
कोप भोगी निसर्गाचे....
खेळ खेळे निसर्गही
अवकाळी ये पाऊस
होतो कर्जाने बेजार
घेई आवळून फास...
किती दोष नशिबाला
नित्य आभाळ फाटत,
भोग भाळी विधात्याचे
स्वप्न मनाच भंगत...
