शब्द वेडी
शब्द वेडी
होती ती शब्दवेडी
शब्दांच्या मेळ्यात रमलेली
शब्दांचेच पूल बांधत
शब्दांशीच खेळत दमलेली
आवडायचं खूप तिला,
शब्दांसोबत रमायला
मेळ्यात शब्दांच्या व्हायचं ,
तहानभूक विसरायला
किती सुंदर ना ते शब्द...
काही नाजूक, हळूवार
काही कठीण, कर्कशही...
काही मनाला व्यापणारे ,
तर काही काळीज कापणारे
पण साैंदर्य प्रत्येकाचं काही औरच!
आणि डौलही औरच काहींचा!
त्यांच्याशी खेळत ,त्यांचा मेळ घालत
विणायची कधी गोफ,कधी हार तर कधी मोठाले शब्दझुले
तर कधी आणिक काही.....
आणि साकारायच्या मग सुंदर कलाकृती..
चारोळ्या, कविता, कथा न कादंबऱ्या च्या रुपात
तिचं ते मोहक शब्दांना मधे अलगद पेरणं
म्हणजे दगडांच्या कपारीत ऑर्किड च फुलणं
हरखायला व्हायचं तिला..
नवीन प्रयोग ती शब्दांवर करायची
नावीन्यपूर्ण असं मग साकारायची
आनंद नवा त्यातून अनुभवायची...
आता तर ती आणि शब्द हेच अस्तित्व
शब्दाशब्दात सापडे तिला जीवनाचे सत्व
आता ती समरस फक्त शब्दब्रम्हाशी
जशी राणी मीरा प्रभू चरणाशी....
