साद तुझी.......अष्टाक्षरी रचना
साद तुझी.......अष्टाक्षरी रचना
साद तुझी येता माझा
जीव वेडावला सारा
गंध मिलनाचे छेडी
चढे मदनाचा पारा
शांत शितल मनास
साद घाली गार वारा
येता कानी अलगूज
प्रीत गंध वाहे सारा
गीत गात प्रणयाचे
चिंब आसमंत सारा
आज बहरूनी आला
जाई-जुईचा पहारा
गर्द छायेत फुलला
ओठी गुलाब हासरा
क्षण झेलूनी प्रीतीचे
वाहे प्रीतवेडा झरा
ओढ अनामिक तुझी
देई रे कडा पहारा
मन अधीर असता
आठवांचा रे सहारा
मनी ऋतू मोहरता
कधी श्रावण सारा
मन पालवी-पालवी
लाभे हिरवा किनारा
शब्द-शब्द उधळूनी
भाव सावरला सारा
साद तुझी येता देई
आज पापणी पहारा

