पुन्हा एकदा तुझी भेट व्हावी..
पुन्हा एकदा तुझी भेट व्हावी..
पुन्हा एकदा तुझी भेट व्हावी
अन् वेळ तिथेच थांबून जावी..!
नजरेतून तू सर्व बोलावं
ओठांना काहीच सांगायचं न राहावं..!!
तुझ्या त्या निरागस हास्यात
माझ सगळ जग सापडावं..!
अन् माझ्या हरवलेल्या मनाला
पुन्हा तुझ घर सापडावं..!!
कितीतरी गोष्टी सांगायच्या आहेत
पण शब्दांनी साथ सोडली..!
तुझ्या एका नजरेनेच मात्र
मनाची सगळी गाठ सुटली..!!
रुसवे, फुगवे, भांडणे सर्व
आठवणीच्या पानात हरवून जावीत..!
अन् नव्याने सुरुवात करतांना
आपली स्वप्ने एकत्र रंगून जावीत..!!
हात तुझा हातात घेतांना
एक वेगळीच शांतता मिळावी..!
जणू या धावत्या आयुष्यात
माझी छोटीशी दुनिया थांबून जावी..!!
तुझ्या सोबत चालताना हा
रस्ता पण सुंदर वाटावा..!
अन् शेवट कुठे आहे हा
विचार मनात कधी न यावा..!!
तुझ्या डोळ्यांत माझ उद्याचं स्वप्न
अन् माझ्या डोळ्यात तुझ स्वप्न दिसावं..!
इतकंच वाटतं आता आयुष्यात
फक्त तू कायम सोबत असावं..!!
पुन्हा एकदा तुझी भेट व्हावी
पण यावेळी काहीच अपूर्ण न राहावं..!
तू माझी अन् मी तुझा
हे नातं कायम पूर्ण व्हावं..!!
