पर्यावरणाचे संरक्षण
पर्यावरणाचे संरक्षण
किती गारवा गारवा , मनभावन गारवा
धरा लेऊन सजली , रंग पाचूचा हिरवा
नवयौवना धरित्री , होई लाजेनं ती चूर
गाली फुलांची गं लाली , तिचा आगळाच नूर
बन हिरव्या वेळूंचं , तिचं रिझवि गं मन
कुठे मैना आणि राघू , ऐकविती गोड तान
इंद्रधनुचा गं झुला, तिला फुलवे झुलवे
पहातच राही धरा, पाखरांचे सारे थवे ..
मनोमनी होई तृप्त , धरा साजिरी गोजिरी
नाही भीती वैशाखाची, आस वसंताची उरी
लेकरांची माय धरा, मनीं होतसें व्याकूळ
जेंव्हा होई पाण्याविना, तिचे उजाड गोकूळ
वृक्ष लता तिची बाळे, खेळताती लडिवाळे
येता घाव मुळावरी, भरताती तिचे डोळे
माय माझी वसुंधरा, मनीं असे एकचि ध्यास
धरो तिची गं लेकरे, वृक्षवल्लींची हो आस
वृक्षवल्लींची ती कास !!
