प्रेमगाथा
प्रेमगाथा
वृत्तबद्ध रचना - (चित्तविलसित वृत्त)
दिनमणि शांत झाला
शशिधर व्योमि आला
हुरहुर दाट होई
लगबग चांदण्याला||१||
नित असल्याच वेळी
दमणुक शांतवाया
सुमधुर गीत गातो
श्रमिक भुलावयाला||२||
नवथर बालिका ती
प्रतिदिन वाट पाही
नकळत छंद लागे
तन मन धुंद होई||३||
कधितरि ओळखीची
तरल स्वरावली ती
उमलत चित्त जाई
लवकर नीज नाही||४||
अवचित साजणाचा
पदरव कानि आला
रुणझुण होत चित्ती
धडधड उरात आता||५||
वदत, "प्रिये, तुझा मी,
सवय तुझीच झाली,
गमत कुठेच नाही,
गडबड होत जाई."||६||
मधुर सुरात ती ही,
"तर मग," त्यास बोले,
"तन मन दान केले,
शरणहि आज आले."||७||
उधळत मोद आला
रवि दुसऱ्या दिसाला
परिणय मंगलाचा
सफलच प्रेमगाथा||८||