पोशिंदा
पोशिंदा
केली मशागत खूप
लई कष्ट उपसले
मिरगाच्या पावसानं
रोप वापूनिया आले//१//
पिक आलं तरारून
दिसे हिरवं हिरवं
वाटे मनास सारखं
उभ्या पिकात फिरावं//२//
घर बांधून शेतात
त्याचा ठिया वावरात
करी शेताची राखण
कष्ट करी दिनरात//३//
कर्ज काढून बळीनं
शेती केली हिमतीनं
पिक येता कापणीला
सारं कर्जामंदी गेलं//४//
गेली पोटाची भाकर
झाला भिकारी पोशिंदा
नाही परवडे त्याला
शेती करणे हा धंदा//५//
गळफास लावण्याची
कर्जापायी वेळ आली
निसर्गाच्या बदलानं
शेती घाट्यामंदी आली//६//
कसा चालवू संसार
नाही शेतामंदी पीक
आता कोणाकडे जाऊ
पुन्हा मागायला भिक//७//