पाऊस
पाऊस
बाहेर कोसळणारा पाऊस
अन भिजून फुलणारी धरा
हवाहवासा वाटतो ओलाव्याने
शरीराला झोंबणारा वारा
अन एक मनातंही बरसतोय
अखंड आतल्या गाभाऱ्यात
ओठांवर फुलते निर्विकार हसू
होणारी घुसमट लपवण्यात
बाहेर पडणारा तो पाऊस
रुजवतोय बी पृथ्वीच्या कुशीत
देतोय जन्म हिरवाईला
नटते वसुंधरा होऊन प्रफुल्लित
आतल्या आत बरसणारी
जीवघेणी ती दबलेली आसवे
मनाच्या कोपऱ्यात उडतात
भयाचे मिणमिणते काजवे
बाहेर कोसळतोय तो बेधुंद
अन पल्लवित होणाऱ्या आशा
येण्याने त्याच्या सुगंध दरवळला
हटली मनातून घोर निराशा
मनातले अश्रुंचे चाले माझ्याशी
गुपित असलेले विचित्र द्वंद्व
माझ्या मनाच्या आशा निराशेने
का होते मन उद्विग्न

