पाऊस आणि तू
पाऊस आणि तू


नभी काळेभोर मेघ दाटून मध्येच वीज चमकावी,
तसं तुही माझ्या मनातील अंधाराला पुसून नवचैतन्य आणशील का रे?
धो धो पावसात बाहेर पडणाऱ्या लोकांचा छत्री आधार बनावा,
तसं तुही या जीवनरूपी नौकेत माझा आधार बनशील का रे?
पाऊस बरसल्यानंतर सगळीकडे मातीचा सुगंध दरवळावा,
तसं तुही प्रेमाचा वर्षाव करत माझ्या आयुष्यात सुगंध पसरवशील का रे?
पावसात न्हाऊन सगळी सृष्टी टवटवीत व्हावी,
तसं तुही माझ्या रुक्ष जीवनाला ताजतवानं करशील का रे?
ओलं चिंब भिजत पावसाचा मनमुराद आनंद घ्यावा,
तसं माझ्या कोरड्या मनाला तुझ्या प्रेम पावसात चिंब भिजू देश
ील का रे?
बळीराजा पाहतो चातकासारखी वाट या पावसाची,
तसं तुही माझ्या एका भेटीची वाट पाहशील का रे?
ऊन-पावसाच्या खेळांमध्ये इंद्रधनुष्य हसतो मध्येच डोकावून,
तसं तुही माझ्या बेरंगी आयुष्यात विविध रंगाची उधळण करशील का रे?
चार महिने बरसून मनाला हुरहूर लावून निघून जातो हा पाऊस,
तसं तुही माझ्या मनाला हुरहूर लावून निघून जाशील का रे?
नको जाऊ रे तू हुरहुरत ठेवून माझ्या मनाला,
आयुष्यभरासाठी कैद होऊ देत रे आपल्या प्रेम क्षणांना माझ्या हृदयाच्या कप्प्यात...
तुझीच,
तुझ्यावर अतोनात प्रेम करणारी तुझी सखी...