माझी मुलीचा वाढदिवस
माझी मुलीचा वाढदिवस
बाळा, आज तुझा वाढदिवस
आठवला दोन वर्षांपूर्वीचा दिवस
तू अलगद माझ्या हातात विसावली आणि
स्वर्ग म्हणतात ना त्याची अनुभूती आली
मम्मा हा शब्द माझ्यासाठी खास झाला
आणि एक गोड जबाबदारी माझ्या पदरी आली
तुझे गोबरे गाल, तुझे बोलके डोळे, तुझे काळेभोर केस ह्यामध्ये मी स्वतःला शोधू लागले..
आणि माझे बालपण तुझ्यासोबत परत आल्याचे जाणवू लागले..
तुझ्या दररोज नवनवीन बाललीला बघण्यामध्ये हरवून गेले.
आणि तुझ्यासाठी कामावरून घरी लवकर निघण्यासाठी घाई करू लागले..
तुझं हसणं, बागडण, घरभर फिरणं माझ्यासाठी सर्वस्व बनलं आणि
तुझ्या हास्यासाठीच माझ घड्याळ फिरू लागलं..
बाळा, तूच माझ जीवन, तूच माझ्या आयुष्याची दिशा आहेस
तुझ्या पंखांना बळ द्यायला आईबाबा अगदी तयार आहेत..
बाळा, आकाशात खूप उंच भरारी घे पण सूर्य मावळता क्षणी आपल्या घरट्याची आठवण होऊ दे..
बाळा, आपल्या चांगल्या कर्तृत्वाने लोकांच्या मनावर राज्य कर पण त्या कर्तुत्वाला अहंकाराचा स्पर्श नको होऊ देऊ..
बाळा, मुलगा मुलगी मध्ये आम्ही कधी भेदभाव करणारच नाही..
आणि तुही मुलगी म्हणून आपल्या स्वप्नांना मोडू नकोस..
बाळा, मुलीसाठी संसार आणि करिअर दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत...
आणि तू ह्या दोन्हींमध्ये समतोल राखशील ह्याची आम्हाला खात्री आहे..
बाळा, तूच आमचा गर्व आहेस, तूच आमची पणती आहे..
आणि तू प्रामाणिकपणाने आमच्या गर्वास सार्थ राहशील ह्यावर आमचा विश्वास आहे..
बाळा, जगात कोणत्याच गोष्टीसाठी शॉर्ट कट नसतो..काहीच फुकट मिळत नसतं
आणि त्यासाठीच काहीही मिळवायचं असेल तर तुला खूप परिश्रम करावं लागेल..
बाळा, तुझ्या रूपात देवाने एका सुंदर कळी पदरात टाकली आहे...
आणि त्या नाजूक कळीचं सुंदर फुलात रूपांतर झालेलं बघायचं आहे..
तुला मोठी होताना बघणं हे माझ्यासाठी खरंतर एक कौतुक सोहळाच आहे...
आणि तुझे मोठे होतानाचे प्रत्येक क्षण आमच्या मनाच्या कॅमेरात कैद आहेत..
आजच्या दिवशी देवाकडे हेचि मागणे की माझे सारे सुख तुझ्या पदरात घाल आणि तुझे सारे दुःख ह्या आईच्या उदरात घाल..
तुझा प्रत्येक वाढदिवस तुझ्यासाठी खूप आनंद, उत्तम आरोग्य, यशाच्या दिशेकडे वाटचाल आणि खूप समृद्धी घेऊन येवो हीच देवाकडे प्रार्थना आहे..
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
