ओळख माझी अपेक्षा
ओळख माझी अपेक्षा
आज जरी तुझं आगमन झालं तरी
निघेन मी तुझ्यासवे...
मी आनंदानं येईन तुझे बोट धरून
तू मला तुझ्या बाहुपाशात घट्ट
कवटाळलेस तरीही मी त्यातून
सुटकेच्या प्रयत्नांशिवाय येईन...
विश्वास ठेव सर्वच जर तुला टाळतात,
तरी माझ्यासारखे प्रेमी तुझ्यावर भाळतात
टाळणारे सारे माझे भाळणे पाहून
डोळे भरून अश्रू ढाळतात....
तुझे आगमन कधी अकल्पीत, अकस्मात
कधी अपघात तर कधी पूर्वसूचना देऊन होते...
माझ्यासाठी मी दरवाजात उभा राहून
आतुरतेने तुझी वाट पाहतोय न बावरणाऱ्या
नववधू प्रियेसारखी! कोणी तुझ्या आगमनाला
अभद्र म्हणत असेल तर त्यांना जीवनाचं...
अंतिम अन् शाश्वत सत्य उमगलेच नाही म्हण ना!
माझी तुझ्यावरील असीम प्रिती जेवढी त्याही
सीमेपलिकडील भीती तुझ्याबद्दल कोणी बाळगीत असेल
तर त्याचं स्वत:वर प्रेमच नाही म्हण ना!
एक दिवस सर्वस्वाचा त्याग करून मला तुझ्याकडे यायचंय!
इतरांनाही मी अपवाद नाही हे दाखवायचंय!
ज्यांनी तुला जिंकलंय असा कोणी संत आहे?
जगण्यावर प्रेम करणाऱ्यांच्या प्रेमाचाही अंत आहे....
माझ्या अनोख्या प्रेमासाठी मी तुझ्या कुशीत येईन....
तेव्हा विलक्षण खुशीत राहून जगणाऱ्याकडे पाहिन....
सारे जरी जीवनासक्त, मी एकटा विरक्त नाही...
तुझ्यापासून कोणी जीव अजून तरी विभक्त नाही...
काय सांगावी तुला माझी आगळी आसक्ती?
ओळख माझी अपेक्षा मृत्यू की प्रीती?
