नवा आशय
नवा आशय
तुझ्या अंगांगाला
शोभून दिसतात चांदण्याचे पदर अस्ताव्यस्त फेकलेल्या
गुलाब पाकळ्या सुद्धा
तुला खुलतात एखाद्या मौल्यवान दागिन यासारख्या.....
तू म्हणजे फुलांची रास
सैरभैर पसरणारा गंध किंवा
वाऱ्यावर विहरणारा सुवास
तू निरभ्र....अनंत आकाशाएवढी व्यापक
तरीदेखील तू सूक्ष्म.... अस्पष्ट ह्रदयाच्या अंतरकप्प्यात मावणारी
तूझी चाहूल
संध्याकाळच्या वेळी
नदीकाठी अलगद उतरणार्या पांढर्याशुभ्र बगळ्यांसारखी
किंवा तुझे अस्तित्व
क्षितिजावरून पुसटश्या दिसणाऱ्या सूर्यबिंबसारखे मर्मभेदी....!
दररोज सकाळी तू सडा शिंपतेस....सुंदर रांगोळी
रेखाटतेस
मग फुलं गोळा करून हार गुंफतेस
तेव्हा मी पहात असतो
श्रमातलं सौंदर्य.....तुझ्यात
तूझं भेटणं
एखाद्या हेलकाव्यासारखं
मनाची फांदी हलतच राहते
कितीतरी वेळ
तुझे शब्द
पाखरांसारखे घिरट्या घालणारे
राहून राहून आठवत राहतात.
डोंगरमाथ्यावरून खळाळत
येणाऱ्या पाण्यासारखे तुझे हास्य एखादा सुंदर देखावा पहावा
तसे मी पहात राहतो.
मलाही तसा थोडा आनंद होतो
कारण माझ्या कवितेला नवा आशय मिळालेला असतो

