गावधुळीत पाऊल माझे
गावधुळीत पाऊल माझे
गावधुळीत पाऊल माझे पडते तेव्हा मी माझा नसतो
आंबट कै-या चाखत तेंव्हा झाडावरती जाऊन बसतो
काळासंगे वाहून गेले गाव नदीचे नितळ निळे पाणी
चंद्र चांदण्या मुक्या जाहल्या आटून गेली गळ्यात गाणी
पानोपानी वसंत वेडा येऊन आमच्या वरती रुसतो
विटी दांडूचा डाव संपला,हरल्या गोट्या बुरजाखाली
अंगत पंगत मजा यायची,खेळ रंगला झाडाखाली
दिवस जुने ते आठवून मनी मीअजून गाली हसतो
नदीकाठच्या वाळूमध्ये झरे खोदले कधी भाजले पाय
शिंक्यावरचे दूध सांडले,चोर पावलांनी खाता साय
बिलायतीच्या तोडून पाकळ्या मी वाजवित असतो
मनात उरती माझ्या केवळ पारावरचे ते टाळ मुके
रहाटास त्या भल्या पहाटे जाग येऊनी
वेळ चुके
भूत समजूनी ओंडक्यास त्या अजून आम्ही फसतो
