‘तुझ्या बांगड्यातून…’
‘तुझ्या बांगड्यातून…’
तुझ्या बांगड्यातून वाजतआलाय आजवर फक्त दुबळेपणाच
तुझा अन् कपाळावरचं लाल कुंकू तेही काळं निळं होत आलंय नेहमीच.
परंपरेच्या पिंजऱ्यात बंदिस्त आहे तुझ्या भावनांच्या पक्षांची प्रत्येक प्रसन्न पहाट अन् तुझे सूर दबून गेलेले कित्येक दिवसांपासून तुझ्याच हुंदका भरलेल्या कासावीस कंठात
दुनियेच्या बाजारात स्वतःचं अस्तित्व हरवून बसलेली तू
-तुझ्या प्रत्येक उमलत्या पावलांना इथल्या उंबरठ्याची
लक्ष्मण रेषा तुझ्या तबकातील निरंजनाची वात काजळलेली
इथल्या बुरसट आणि खुळचट विचारांनी
आता मात्र याला कुठेतरी पूर्णविराम द्यायला हवा
अन् तुला बोलता यावी तुझ्या ओठातली स्वतंत्र भाषा काढायला हवी
तू मुक्त रंगातली रंगीत रांगोळी सुखाच्या दारात
ज्ञानाची गोफण घेऊन उडवायला हवीत तू तुझा प्रकाश वेचू पाहणारी
पाखरं अन् सारं बळ एकवटून पुसून काढायला हवेत तू
इथल्या नजरेच्या चंद्रावरचे वासनांचे डाग
