निरोप
निरोप
नको ढाळूस अश्रूंना तुझ्या डोळ्यात राहू दे
सुरेले गीत आहे मी तुझ्या कंठात राहू दे
अशी दैवा नको टोकू गुन्हे ते आपले होते
यशाची भाग्यरेखा ती तुझ्या हातात राहू दे
गुलाबी बाग आहे ही फुलांना गंध प्रेमाचा
सुगंधी मोगर्याला तू तुझ्या केसात राहू दे
निरोपाच्या क्षणी आता स्वत:ला सावरावे तू
जरासे हास्य लावण्या तुझ्या गालात राहू दे
नको सांगू कधी कोणा कहाणी लुप्त प्रेमाची
तुझे माझे जुने गाणे तुझ्या ओठात राहू दे

