निःशब्द
निःशब्द
सांग ना रे तुझ्या माझ्या
जगण्यास का उरला अर्थ
हात अजुनही तोकडेच
सामोरी जरी घोर अनर्थ
खचलेल्या धरेसवे
तरलेले जीव थोडे
तगमग ही श्वासांची नि
रिक्त घडे, ठाकले कोडे
जळ जाळते का जीवा
तृषा का ते भागवेना
सुन्न झालीत स्पंदनेही
डोळा आता पहावेना
आसवांची गर्द दाटी झाली
महापूर भावनांचा आला
बांधही फुटलेत सारे
आधारही निसटला
निराशेच्या गर्तेत त्या
स्तब्ध जीवनप्रवास
प्रलयांचीच नांदी सारी
विरत चालले कुंद श्वास
कोनाड्यात मनाच्या रे
तेवणारी अजूनी आस आहे
छिन्नविच्छिन्न संसारदशा
प्रदीप्त तरी विश्वास आहे
उसवलेल्या माणसांच्या
गुंतलेल्याच मनवेदना
आपत्तीच हवीय का नित्य
जागवण्यास खोल संवेदना
बाप निसर्ग कोपला आज
देई बा देवा मायेची पाखर
वाताहात या सृष्टीची करताना
कर्मफलांचा आम्हा पडे विसर
