मिळालं असतं हवं तसं..
मिळालं असतं हवं तसं..
जे हवं ते मिळालं असतं, तर स्वप्नांना किंमत उरली असती का?
राधेचा तो विरह नसता, तर 'कृष्णा'ची ओढ उरली असती का?
कधी कधी रिकाम्या हातांनीच, नशिबाचे बंध विणायचे असतात,
डोळ्यांतील आसवांनाही, संघर्षाचे रंग लेवायचे असतात.
सुख म्हणजे काय? फक्त हवं तसं घडणं नव्हे,
तर जे घडतंय, त्यात स्वतःला शोधणं, हेच खरं जगणं आहे.
रुक्मिणीने स्वीकारलं स्थैर्य, अन् राधेने निवडला ध्यास,
दोघींच्याही वाट्याला आला, शेवटी 'माधवाचा'च श्वास.
तू शोधतोस सुखाला बाहेर, पण ते तुझ्याच बदलात दडलंय,
ज्याला मिळालं नाही 'हवं तसं', त्यानंच जग जिंकायला शिकलंय.
अपेक्षांच्या वादळात, मनाची नौका डळमळू देऊ नको,
आयुष्य जर बदलत असेल, तर प्रवाहाच्या विरोधात पोहू नको.
कारण...
ज्या जखमांनी तुला थकवलं, त्याच तुला सावरतील,
अन् हीच अपूर्ण स्वप्नं तुझी, उद्याचं सामर्थ्य बनतील.
जर मिळालं असतं सारं काही, तर जीवनाचा अर्थच हरवला असता,
अनवाणी चालल्याशिवाय, या मातीचा गंध कधी गवसला असता ?
शीतल केंद्रे
