माझी कविता
माझी कविता
माझी कविता कविता
हिरवागार जणू मळा,
त्याने सुसह्य होती
उन्ह आणि त्याच्या झळा.
माझी कविता कविता
सखी आणि माझा सखा,
तिच्या सोबतीत मला
लाभे आनंदाचा मोका.
माझी कविता कविता
झाड -वेलीला बहर,
तिच्या बहराने मग
मनी नाचतो मयूर.
माझी कविता कविता
अभंगाची जणू गाथा,
विसरून माझी व्यथा
मी टेकवितो माथा.
माझी कविता कविता
जशी दुधावर साय,
तिच्यातून मज दिसे
माझी जन्मदात्री माय.
माझी कविता कविता
माझा जीव की प्राण !
तिच्यामध्ये रमे मग
थोर आणि हो सान.
माझी कविता कविता
मी हो कवितेचा कर्ता,
नम्र राहून तिच्याशी
घडो नित्य शब्दसेवा.
