कविता
कविता
एखादा विचार सारखा मनात ठसठसावा...
तशी नसानसांत भिनत राहते कविता ,
कधी व्यक्त, कधी अव्यक्त होत राहते कविता
ज्वालामुखी बनून हृदयात, उसळत राहते कविता !
तर कधी भावनांचा पाऊस घेऊन, नवविचार पेरते कविता ...
दुखत असते कविता आतल्याआत , कागदावर उतरवली गेली नाही तर...
मनांगणाच्या उंबरठ्यावर सजते , कधी शब्दसुमनांची जर ,
नाहीतर उगाचच कधी उचंबळून येते ,अल्लड पोरासारखी खोडकर
कोणी आठवण काढावी अवेळी , तसा अनैच्छिक उचकीतला स्वर !
धुसफुसत राहणाऱ्या मौनातला....स्पष्ट आवाज...
अबोल,मुक्या शब्दांचा... आक्रोश असते कविता ,
न देता येणाऱ्या उत्तरांची अस्वस्थतता ,तडफड असते कविता
वर्षानुवर्षे गोठलेल्या ताणावरचं..औषध असते कविता
जीवनाला थकलेल्या माणसाची,हिंमत असते कविता !
मेंदूतल्या आभाळातून.. संवेदनांच्या सागरात पोहोचलेली पहिली ओळ सुंदर...
तुझ्या-माझ्यातलं संभाषण सुरू होत.. कापून संपलेलं अंतर ,
समोरून, पाठीमागून आलेल्या निंदेला , धारदार पंक्तीचां वार खोलवर
कधीतरी मरगळ दूर करणारी ,कौतुकाची थाप पाठीवर !
आत्म्याच्या गर्भात नियमित... रूजत,फुलत प्रसवते...
कुठल्याही परिस्थितीत...झाशीच्या राणीच्या रूपात ठाम उभी असते कविता ,
सन्मान, आदर,आदर्श, टिकवून असते कविता
जुनी ओळख पुसत नव्याने जन्म घेत असते कविता
माझ्याच काळजातील घावात , दरवेळी माझीच रुतून बसते कविता !
