किरणांचा पाऊस
किरणांचा पाऊस
चंदेरी घन बहरले
किरणांचा पाऊस ये
चिंब भिजून चांदण्यात
सये संगतीस ये
निळ्या मोकळ्या नभात
खुलतो हा चंद्र कसा
किरणांच्या पावसात
होय जीव पिसा पिसा
न्हाऊनिया अमृतात
प्रीती पुजनास ये(१)
गडद निळ्या सागरी
लाटेवर लाट उठे
भेटण्यास शशिधरास
की धरेस पंख फुटे
त्या स्वप्नील मिलनी
विसर दुःख हास ये(२)
अशा निरव एकांती
देह भान विसरुनी
मोहरता प्रीती फुले
गंध जाय दरवळूनी
लपवशिल तू किती सुगंध
थंड या हवेस ये(३)
रात संपता विझेल
चंद्र चांदणे गगनी
गेला क्षण जीवनात
नसे येत परतुनी
चांदण्यात फिरण्याची
पुरव खुळी आस ये(४)