जेव्हा पावसाचे नेपथ्य हरवते....
जेव्हा पावसाचे नेपथ्य हरवते....
शमली तृष्णार्तता करुनी साजरे
सृष्टीच्या निर्मितीचे सोहळे
कोण जाणे कसे लागले
श्रावणास नाटकाचे डोहाळे
नव्या कथा, नवे प्रसंग करण्या
कलाकारांची लगबग झाली
ऊन-पाऊस, वारा, ढगाची
तालीम जोरात सुरू झाली
रंगला पडदा नैपथ्याचा
अद्भुत नजारा सारे दंग
शिंपडले सारवले त्यावर
होते नव्हते सगळे रंग
कसे, किती वेळ बरसायचे
कुठे, कुणी पॉज घ्यायचे
सगळी गणितं जमली नेट
केवळ बाकी प्रयोग एक
वस्त्रे-शस्त्रे घेऊनि पोचला
लवाजमा रंगीत तालमीला
गंभीर गोंधळ झाला एक
नैपथ्याचा पडदा हरवला
त्या पडदयावर पाखरांचे
थवे घरट्यास परतत होते
पाण्यात सावल्या झाडांच्या
कृष्णकांती मेघ होते
सारे रंग ओतुन संपले
समोर सुके कुंचले होते
नवीन काही करावे तर
हातचे दिवस संपले होते
एक सभा झाली साऱ्यांची
नैपथ्याच्या विषयावर
तापले धुसफूसले सारे
त्याच्या धांदरटपणावर
हरकत नाही... काढू मार्ग
गवताची पाती सळसळली
अस्पष्ट असले बोल जरी ते
स्फुलिंग चढले, हुशारी आली
एक काळा रंग बापुडा
कोपऱ्यात होता पहुडलेला
अभ्राच्या पडद्यावर कोणी
जमेल तसा तो फासला
वाऱ्या-पावसाकडे विश्वासाने
धुरा संगीताची केली सुपूर्द
सांगितले टाक गर्जवून आसमंत
नको उसंत घेऊ क्षणार्ध
प्रकाशास काजव्याची टीमटीम
वामांगी भुईने ओढले पांघरून
पक्षी झाडांच्या कुशीत लपले
वीज-वाऱ्याचे दुहेरी आक्रंदन
पहिला प्रयोग तुफान गाजला
रजनीच्या पटांगणात
मुसळधार फैरी झाडीत झडला
पाऊस गारांच्या वर्षावात
असे अद्भुत नाटक यांचे
श्रावणातल्या रात्री रोज
नवे नक्षत्र नवे वाहन
नवे शृंगार राजरोस
जेव्हा केव्हा काळोख्या रात्री
पाऊस धुमशान हजेरी लावी
आपणच समजून घ्यायचे
नैपथ्य अजून गवसले नाही
