STORYMIRROR

Neeta Khedkar

Drama Romance Fantasy

3  

Neeta Khedkar

Drama Romance Fantasy

तुझा पाऊस सरीचा...

तुझा पाऊस सरीचा...

1 min
190

तुझा पाऊस सरीचा, भुईला या गोंजारतो

माझा ओथंबूनी येतो, चिंब चिंब भिजवितो

तुझा पाऊस सरीचा, न्हाऊ माखू ग घालितो

माझा धो धो बरसूनी तिच्या भेगा ग सांधतो

तुझा पाऊस सरीचा, फांदी फांदीला ओहोळ

माझ दुथडीच पाणी, सारं गढूळ गढूळ

तुझा पाऊस सरीचा, त्याची मखमली झालर

माझा सांडतो असा की, जाते वाहून घागर

तुझा पाऊस सरीचा, किती अल्लड- वेल्हाळ

माझा शहाणा सुरता तरी उडवी गोंधळ

तुझा पाऊस सरीचा, गंध मातीचा माईना

माझा आक्रस्ताळी मोठा, रानोमाळ सारी दैना

तुझा पाऊस सरीचा, ओघळत्या ग पन्हाळी

माझा वाहतो तुडुंब, ओसंडून जाती तळी 

तुझा पाऊस सरीचा थेंबा थेंबात गारवा

माझा झिम्माड उनाड, गारठतो ग पारवा

तुझा पाऊस सरीचा, रंध्रे सारी खुलवितो

माझा पाऊस खट्याळ, रंग पानांचा पुसतो

तुझा पाऊस पाऊस, माझा पाऊस वळवाचा

तुझ्या सरीत लावण्य, माझा अवघा गाजावाजा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama