हिरव्या शेतात
हिरव्या शेतात
हिरव्या शेतात झुलत कणीस धानाच देखण,
धनी शेताचा करतो त्याच्या धनाच राखण.
आला पाखरांचा थवा निळं झाकीत आभाळ,
बाप फिरवी गोफण खोल घालूनिया शिळ.
नव्हता बरसला मल्हार होता दुष्काळा-व-दुष्काळ,
यंदा बहरल रान येता सरींचा सुकाळ.
लयी कष्टानं फुलल काळ्या मातीत हे सोन,
शेत शेवटच पिकुन झाली होती वर्षे दोन.
जीव सुखावला पाहून टपोर धानाच हे दाणं,
दिल धरणीनं लेकाला त्याच्या घामाच र दाम.
कामाची रीत बदलली नवी साधन ही आली,
आता पूर्वजांची गाणी फक्त आठवण राहीली.
आता नाही होत खळ अन् खळ्यातल गाणं,
माणसांनी भरलेल शेत वाटतय सुनं-सुनं.
