हिरकणी
हिरकणी
पाटी दुधाची घेऊन
चाले ती रायगडाला
घरी झोळीत निजवे
तान्ह्या आपल्या बाळाला ।।
गवळण हिरकणी
गड बाजारी फिरली
नाही विकले दुध ही
घरी जाण्या वेळ झाली ।।
झाले दरवाजे बंद
होता पडला अंधार
येता हिरकणी ध्यान
नसे बाळास आधार ।।
कोणासाठी बाळासाठी
जीव धोक्यात घाटाला
आई हिरकणी शोधे
तीच त्या पाय वाटाला ।।
कडा गडाचे उतरे
जीव मुठीत घेऊन
ध्यास आपल्या बाळाचा
गेली कडा उतरून ।।
नाव त्या रायगडाच्या
बुरुजाला हिरकणी
तिची कहाणी शौर्याची
दिले शिवाजी राजानी ।।
होता दरवाजे बंद
केला धाडशी विचार
उतरुन मर्दानी ती
गेली हिरकणी नार ।।