गुज अंतरीचे
गुज अंतरीचे
लख्ख चांदणे नभीचे,
प्रकाशीत रात होती,
चांदोबांच्या भोवताली,
चांदण्यांची रास होती.
चांदण्यांचा मोह तो,
नव्हता शीत चांदोबाला,
अलिप्त भाव जणु तो,
होता त्याच्या जगण्याला.
खेळ खेळे दुर नभी,
एक लावण्यकळी अंगणी,
रूपवान गोरटी ती,
शोभा वाढवी तारांगणी.
खळखळुन हसे गाली,
चांदणी मनमुराद स्वच्छंद,
साद घालताना तिला,
वारा वाहे मंदमंद.
हास्य तिचे बघण्याचा,
चांदोबाला जडला छंद,
जुळले नाते असे काही,
जणु फुल आणि गंध.
पुणवेच्या त्या चांदोबाने,
प्रेमाचा वर्षाव अती केला,
प्रेम प्रकाशाने त्याच्या,
चांदणीचा प्रभाव कमी झाला.
अती प्रेम प्रकाशाने,
चांदणीचे आस्तित्व कमी होते,
काही दिवसाने हे सत्य,
चांदोबाला कळाले होते.
लख्य रूप झळकावे तिचे,
म्हणुनी तो कालोखी लुप्त झाला,
करूनी प्रकाशमय चांदणीला,
चांदोबा पूर्णत्वास गेला.

