घटस्फोट एक वणवा (गझल)
घटस्फोट एक वणवा (गझल)
कुठे गेला कसा गेला मला सोडून बाबा तू
इथे आगीत गेला का मला लोटून बाबा तू
सुखी संसार होता ना मला सांगायची आई
सुखालाही कसा गेला तुझ्या जाळून बाबा तू
फुगे फुगवायचे होते मला खेळायचे होते
कुठे गेलास रागाने फुगे फोडून बाबा तू
पडावे मी किती वेळा रडावे मी किती वेळा
जरा भेटून जातो का मला हसवून बाबा तू
जगावे मी कशाला वाळवंटा सारखे जीवन
बरसतो का जरा आता ढगा आडून बाबा तू
कुठे आहे तुझे बाबा विचारी मित्र शाळेचे
अनाथा सारखे केले मला टाकून बाबा तू
मला येते रडायाला तुझे मी नाव लिहिल्यावर
तुझ्या नावास का गेला मला देऊन बाबा तू
नसे झोपा मला आता तुझ्या वाचून रात्रींच्या
जरा स्वप्नात जातो का मला भेटून बाबा तू
