एवढे करशील का
एवढे करशील का
दीनदुबळ्या पीडितांना
साह्याचा हात देशील का
अनाथ पोरक्या लेकरांसाठी
सख्या एवढे करशील का
दुःखितांच्या भिजल्या पापण्या
बोटांनी अलगद टिपशील का
निरपेक्ष सहाय्य करताना तू
सढळ हातानेच पुरवशील का
संचिताचे देणे देतानाही आता
मागे वळूनीही तू पाहशील का
तुझा सुखी संसार सजवताना
तुझे दोन्ही हात मज देशील का
आयुष्यभर संसाररथ हाकताना
प्रेमाच्या मार्गावरूनी नेशील का
सुखदुःखाच्या वाटेवरुनी जाता
थोडेसे थबकूनी तू जाशील का
शेवटच्या घटका मी मोजताना
मांडीवर तुझ्या मला घेशील का
साश्रु नयनांनीच निरोप देताना
डोळ्यांत मला साठवशील का

