एक निकाल… आयुष्याचा
एक निकाल… आयुष्याचा
निकाल आज हाती आला
तिच्या एका वर्षाच्या मेहनतीचा…
आयुष्यात शैक्षणिक यश महत्वाचं होतंच
पण तिच्या जीवापेक्षा नाहीच…
काय यश मिळाले मला
माझ्या १८ वर्षाच्या मेहनतीचे
ओंजारून गोंजारून प्रेमाने तिला वाढवल्याचे…
तिचा चेहरा देखील त्यांनी मला पाहू दिला नाही
खेकसून सांगत होती मी
मीच पाहिले होते रे तिला सर्वात आधी
देऊ द्या मला शेवटची एक पापी साधी…
इतकं मोठं पाऊल उचलताना
एकदा तरी आमचा विचार तिने करायचा
कालपर्यंत घरात धिंगाणा घालणारी ती
आता तिचा मृतदेह तरी कसा पाहायचा…
स्वप्ने पहिली होती मी
जाईल जेव्हा ती लांब आपल्या नवऱ्याकडे
सुन्न होईल सारे कसे
खरंच गेली ही कायमची
त्या निष्ठुर देवाकडे…
हे काय करून बसली ती कळेनासं झालंय
जीवित शरीर माझं
मृत झालंय…
