द्वंद्व तो की ती चे...
द्वंद्व तो की ती चे...
स्वतःच्या जन्मावर तिचे किंवा त्याचे
बरेचसे प्रश्नचिन्ह ऊमटलेले
मी ती की तो...? या वरच विचार करत
हे आयुष्य निसटलेले... {१}
सुदृढ देह लाभलेला तरीही
बायकी नजाकत न्यारी
शरीराशी विसंगत वागणे म्हणून
त्याचे समाजात स्थान अर्धनारी...{२}
समाजाने नाकारलेल्या या जीवाला
आणि मनाला ही प्रश्न बरेच पडलेले
काय वाकडीक होती नशीबाशी
म्हणून हे जगणे असे घडलेले..{३}
छक्का हिजडा नामकरणातली विव्हलता
क्षणो क्षणी जाळत असते
रस्त्यावरची त्या हाताची टाळी
ह्रदयातुन आक्रंदताना दिसते.. {४}
माणसाचे माणसाशी असणारे
माणुसकीचे नातेच ईथे संपलेले
तो की ती या नजरेतुन बघतानाही
वासनांध विचारानेच जाळलेले .. {५}
भडकशा त्या रंगरंगोटीचा
अर्थ कोणी ना जाणिला
मिळेल तस ओरबाडुन घ्यावं
या विचारानेच प्रत्येक जण चेकाळलेला ...{६}
असेल काही नैसर्गिक गुंतागुंत
त्या जीवाच्या गर्भनाळेची..
समाज का गाजवतोय षंढ मर्दुमकी
त्यांचं जगणं नाकारण्याची..{ ७}
थोडं भानावर यावं समाजाने
माणसासारखं त्या मनाला ही जगू द्यावं...
कुविचारांच्या सगळ्याच शस्रांना
समाजाने आता म्यान करून ठेवावं... {८}
जिवंत मनाच्या त्या देहाला
अभिमानाने जगण्याच्या वाटेनं जाऊ द्या ....
समाजातला घटक म्हणून
त्याला ही मोकळा श्वास घेऊ द्या {९}
