चार ओळी लेकीसाठी
चार ओळी लेकीसाठी
आज लेखणी चालत नाही, काय लिहावं कोणासाठी
सतत एकच विचार मनी, चार ओळी लेकीसाठी
हल्ली तुझ्यावर खूप रागावतो, काळजी तुझ्यासाठी
सारं मला खूप आवडतं, जणू छंद माझ्यासाठी
या सगळ्यात तुझा बालहट्ट वाढतोय, तो आनंदासाठी
सतत एकच विचार मनी, चार ओळी लेकीसाठी
तुझं रागावणं रुसणं चिडून, सारं कश्यासाठी
हट्ट पूरऊन घेऊन, नंतर मग हसण्यासाठी
बेभान होऊन दुडू दुडू असं, ते पाळण्यासाठी
सतत एकच विचार मनी, चार ओळी लेकीसाठी
गमतीने येतेस कुशीत, अलगद असं लपण्यासाठी
घाई असते परतीची, दुसरीकडे जाण्यासाठी
क्षण ही अपुरा असतो, परत लपण्या येण्यासाठी
सतत एकच विचार मनी, चार ओळी लेकीसाठी
आधी भूक लागायची, ती फक्त भाकरीसाठी
आता कायम ओढ, तुला पाहण्यासाठी
वेळ हवा वाटतो सतत, तुझ्या सोबत असण्यासाठी
सतत एकच विचार मनी, चार ओळी लेकीसाठी
