चांदणी
चांदणी
केली आज बसुनी मी मोजदाद चांदण्याची
जीवनातल्या माझ्या बेरीज वजाबाकीची
तक्रार करावयाला मी चंद्राकडेच गेलो
दे चांदण्या माझ्या मी ही असे म्हणालो
सगळ्यांनीच माझ्यासवे त्याकडे घेतली धाव
रे शशी आमच्या चांदण्यांचा तू हिशोब लाव
डोळे मिटून तो चंद्र विमनस्क बोललासे
लुप्त तुमच्या चांदण्या माझ्या नभात वसे
दाखवूनि एक एक चांदणी त्याच्या नभातुनी
चंद्र बोलला तो ही माणसे तुमच्यातुनी
होती एकटी आणि दुःखी तुमच्या प्रांगणात
घेऊनि आलो मी त्यांना सुखाच्या अंगणात
हासुनी आमच्या वरती चंद्र असे म्हणाला
घेऊनि चांदण्यांना रे तुम्ही कुठे निघाला
या अंगणात माझ्या शांत चमचमतात
तुमच्या दुःखी जगाचा द्यावा ना त्यांना त्रास
