भीती
भीती
काळोख्या भिंतीवर उमटलेल्या
स्वत:च्याच राक्षसी आकृत्या
मंद दिव्यात भासायच्या दैत्यवत
बालपणी...आणि मग?
वाटायची भीती..खूप भीती
एक एक इच्छा पुरवतांना
बाबाची होणारी दमछाक
कपाळाचा घाम आणि
पाऊस भरलेले डोळे...आणि मग?
वाटायची भीती..खूप भीती
क्षितिजावर नजर जाताच
धरेला कवेत घेणाऱ्या
अफाट नभाला गवसण्याच्या
युवा अकल्पित स्वप्नाची...आणि मग?
वाटायची भीती..खूप भीती
कळीतून जन्मलेल्या फुलाचा
सुगंधी श्वास उदंड करण्याची
आणि फुलपाखरांच्या रंगांची
हातावरची छाप जपतांना...मग
वाटायची भीती..खूप भीती
वळीव पावसागत तुझे भेटणे
आणि अपूर्ण हर्षापाठी
जन्माचा विरह पदरी देऊन
निघून जाणे कायमचे...आणि मग?
वाटायची भीती..खूप भीती
शाश्वताची भीती..
अविश्वासाची भीती..
अपयशाची भीती..
आठवणींच्या काहूराची भीती..
माणसांच्या गर्दीची भीती...
आणि हो...आज तर चक्क
पावलागणिक वाट पाहणार्या
मृत्यूगत जगण्याची...भीती.
पण...विषाणूला नसतेच कसली भीती!