बांग कोंबड्याने दिली
बांग कोंबड्याने दिली
बांग कोंबड्याने दिली
सूर्य डोकावून पाहातो
मैना सुरात गाते
वारा थुईथुई नाचतो
सर पावसाची आली
मोर पिसारा फुलवितो
बहर फुलांचा बहरूनी
भवर छेडुन जातो
आभाळ भरून गेले
सर धावून आली
थेंब मातीत शीरून
ओटी भरून गेली
औत खांद्यावर घेतले
पाय मातीत रूतले
हिरवे हिरवे स्वप्ने पाहून
हसू गालावर फुलले
पाट खळखळ वाहतो
डोळे भरून पाहतो
माती अंगाला लागते
जीव शेतात रमतो
सदरा अगांत फाटका
ठिगळ लावून घालतो
फाटक्या लुगड्याच्या पदरात
सुख बांधून जगतो
खुडा भाकरीची न्यहरी
पंचपकवानाचा घास
कष्टाच्या घामाला
अत्तराचा वास
धस पायात घुसली
डोळे पाणाळून गेले
माती मायच्या काळजात
कळ छेदून गेली
रानावनात जाते
बळीराजाचे जीवन
नाही दसरा दिवाळी
नाही पुरणपोळीचे जेवण
पीक करपून जाते
वाट पावसाची पाहून
कुंकू पुसुन जातो
फास गळाभेट घेवून
