बाई
बाई
हातावरच्या मेहंदीत
नक्षी दुःख यातनांची
बाई जीवास आस
फक्त प्रेमळ शब्दांची
टिचलेल्या बांगडीने
मऊ हात सोलवटे
तरी निबर मनगटाने
बाई संसार पेलवते
देह मनाच्या लपवी
रक्ताळलेल्या खुणा
हसू ठेवून डोळ्यामध्ये
बाई नव्याने जगते पुन्हा
बोरी-काटेरी जगण्याची
नसे मनी तिच्या खंत
झाले गेले लावून किनारी
बाई वाहत राहते संथ
समर्पणाची चूल बाई
दिससांज धगधगते
जळण जीवनाचं ती
संसारापायी वापरते...
आम्रपाली (आमु)
