झाडांचे भविष्य
झाडांचे भविष्य
खरंच कळत असेल का
झाडाला भविष्य स्वतःचे
खरच काय रहस्य असेल
हिरव्या पानावरल्या रेषांचे
कधी किती काळापर्यंत
असेल बहर कळ्या फुलांचा
आणि समजत असेल का
अचूक क्षण पानगळीचा
कुठल्या नक्षत्राचा थेंब
करेल स्पर्श पहिला?
कुठल्या दिशाची हवा
झुलवेल कोवळ्या फांदीला?
अंकुर फुटेल माती मधून
कुठले झाड जगवले जाईल?
आणि हे ही उमजत असेल का
कधी कुठल्या कामी येईल?
की समर्पणच लिहिले असावे
फांदी फांदीच्या भाळावर
"जीव लावा आम्हालाही"
इतकंच असेल पानाच्या रेषांवर
आम्रपाली (आमु)
