औंदाचं साल
औंदाचं साल
कुत्रं ना खाये असे केले माहे पावसानं हाल
मरेपावतर भुलनार नाही ' औंदाचं साल' ॥धृ॥
पीककर्ज घेऊनशां वावर होतं पेरलं
कशी कराची मशागत थे मनामंधी हेरलं,
पेर होती साधली, वाटे ज्यमते खरं यंदा
ऊजवून टाकीन लेक माही लाडाची चंदा,
सपन दादा माह्यावालं झालं चकनाचूर
मुया सळून जवून मेली जवानीतच तूर,
पावसानं माह्या सारा बिघळवला ताल ॥१॥
रपाळ फसे वावरात पेरलं तवापासून
पिकाची दाबून गच्ची,तन शेंडा काढे हासून,
उडीद- मूंग मले भाऊ तोडाच नाही लागला
कोनं कोनं तोळला पन थोही निरा डागला,
सूर्य होता गायब, ऊनीचं गेलं होतं मढं
घुगर्या झाल्या त्याच्या,मांडा लागल्या ढोरापुढं,
सांगू कसं तुले राज्या,माही पुरी झाली लाल ॥२॥
सोयाबीनचं पीक मातर भल्लं होतं जोमात
वाटे तगवते हे मले,नाही धाळत कोमात,
कमरीलोक पीक पाहून बेज्ज्या ये हरीक
गरिबाचं लेकरू नाचे,जसं भेटल्यावर खारीक,
पाऊस झाला सुरू तशा गवू लागल्या शेंगा
सोयाबीनंही दाखोला मले आपला ठेंगा,
हुपिजली गंजी जरी ताडपत्री होती ढाल ॥३॥
पर्हाटिले फुलंबोंडं माह्या दिसत होते बरे
पाऊस कसा तवा निरा चिलटावानी झरे,
कापूस लागला फुटू तवा असा झाला चालू
नख्यातूनच कापसाच्या वाती लागल्या हालू,
दिवाईचं जाऊ द्या थे आमच्यासाठी नोतीच
सालभर काय खाव ? चिंता पळली मोठीच,
शासन ओढेल हाय गेंड्याच्या कातड्याची शाल ॥४॥
