अश्रू दाटलेले
अश्रू दाटलेले
मनी आसवांचे धुके दाटले
असंख्य दुःख ह्या मनी साठले,
कशी करू मी वाट मोकळी
माझ्या ह्या अश्रूंना, माझ्या ह्या अश्रूंना...
बालपणी ऊरी स्वप्न बाळगले
शिकून मोठी होईन मी,
शिखर यशांचे चढून अलगद
ऊंच भरारी घेईन मी
सुंदर अशा ह्या विश्वामध्ये
सप्तरंग मग भरायचे,
अद्वितीय असे कार्य करूनी
इंद्रधनूला धरायचे
किंतु स्वप्न अन् सत्यामधला
फरक हळूहळू कळू लागला,
गरीब घरातील मुलगी होण्याचा
दंड मला मग मिळू लागला
पोटाची खळगी भरण्यासाठी
जगण्याची धडपड सुरू जाहली,
हलाखीचे जीवन जगताना
स्वप्ने सगळी भंग पावली
बालपणाचा काळ उलटला
तारूण्याला उभारी आली,
माझ्या आयुष्यातील दुःखाची
नवीन मालिका सुरू जाहली
अंग झाकण्यासाठी मजला
वस्त्र अपुरे पडू लागले,
क्षणोक्षणी वाईट नजरांचे
आघात मजवर होऊ लागले
कठीण परिस्थितीतील स्त्रीला
अब्रू वाचविणे अवघड होते,
वासनांध नराधमांकडून तिची
अचानक कधीतरी शिकार होते
अशाच नीच गिधाडांनी माझ्या
चारित्र्याच्या चिंध्या केल्या,
शरीरासंगे मनाला माझ्या
असंख्य यातना देऊन गेल्या
चोहीकडे अंधार दाटला
असा घाव नियतीने घातला,
कशी करू मी वाट मोकळी
माझ्या ह्या अश्रूंना, माझ्या ह्या अश्रूंना...
