अशीच प्रीत राहू दे....
अशीच प्रीत राहू दे....
अंतरीच्या गाभाऱ्यात, तुझाच दीप तेवू दे
उजळूनी संसार माझा, अशीच प्रीत राहू दे।।धृ।।
जपूनी प्रीत ही मनी, जीव हा नादावला
प्रणयातील स्पर्शाने, प्रीतगंध दरवळला
प्रीतीचा हा प्रेमवारा, दिगंतातही वाहू दे
उजळूनी संसार माझा, अशीच प्रीत राहू दे।।१।।
रित्या ओंजळीत माझ्या, फुलांचा सडा शिंपला
मुग्ध झाला आसमंत, अवघाच श्वास जिंकला
सुगंधी क्षणातील हा, बेधुंद श्वास वाहू दे
उजळूनी संसार माझा, अशीच प्रीत राहू दे।।२।।
नभांगणातील चांदण्यात, क्षण प्रीतीने बहरला
तुझ्या नेत्रकमलातुनी, रोम-रोमी शहारला
हळव्या भावनांना सखया, प्रेमातुनी न्हाऊ दे
उजळूनी संसार माझा, अशीच प्रीत राहू दे।।3।।
ओथंबलेल्या घनातुनी, प्रीतझरा हा वाहला
सरी-सरीतून मनाचा, गाभारा हा नाहला
मी माझेपण रीते होऊनी, तुझ्यातच मजला पाहू दे
उजळूनी संसार माझा, अशीच प्रीत राहू दे।।४।।

