अरे वांझोट्या ढगा
अरे वांझोट्या ढगा


अरे वांझोट्या पांढऱ्या ढगा
का दाखवतोस उगाच आशा
थेंब भर दिकून पडत नाहीस
निलाजऱ्या
वाऱ्यासंगे गुंडाळतोस गाशा
तुझा पिंजका कापूस
उगा देतो खोटी छाया
उरी पान्हाच आटला
कशी लागेल रे माया
ओला किंवा सुका
का रे
आमच्याच नशिबाला
ज्याचा कोणी वाली न्हायी
त्याचा तुझ्यावरच रे हवाला
कशी जगतील गुरेढोरे
कशी जगवू मी पोर
कधी अस्मानी कधी सुलतानी
दोन्हीचा बी बसतोय मार
इकडे थेंबही पडेना
डोळ्यातून पाणी खारं
आग पोटात पडली
चूल मात्र थंडगार