जगाचा पोशिंदा
जगाचा पोशिंदा
धीर धर बळीराजा
नको होऊ हताश
चिज होईल कष्टाचं
पडेल अन्न घशात
बैलाबरोबर माया तुझी
काळी माती आई
राबतो रात्रंदिन शेतात
पोटात न्याहरी नाही
अनवानी अन् अर्धवस्त्री
साज चढवतो तू धरणीला
निसर्गाचा लहरीपणा तव
धुळीत मिळवतो करणीला
व्यापाराची साठेबाजी अन्
सावकाराचा बोजा
महिना श्रावण असो की रमजान
तुला नेहमीच घडतो रोजा
खचू नकोस लढत राहा
कर शेतीसोबत जोडधंदा
बायको पोरांचा विचार कर
तुच खरा जगाचा पोशिंदा
