वठलेलं झाड
वठलेलं झाड
वठलेलं झाड
माळरानी खडकात
उभं वठलेलं झाड
गुज गतवैभवाचं
करी मनाशी उघड
देह थकला निष्पर्ण
तग धरून एकांती
पाल्यापाचोळ्याने पहा
साथ सोडलीय अंती
अंगाखांद्यावर वारा
खेळ कितीदा खेळला
त्याचा तुफानी तो कावा
नाही झाडास कळला
जीर्ण झाडावर आज
नाही वसंत बहार
रुक्ष काष्ठ काटक्यांचा
त्याच्या तनमनी भार
भाव परोपकाराचे
नसानसात भिनले
सावलीस स्वतःच्याच
आज झाड ते मुकले
