अनघ जग
अनघ जग
ह्या आभाळापल्याड म्हणे एक जग आहे,
संपूर्ण निराळे.... अनघ असे..
तुझ्या आत जसे आहे ना अगदी तसे..
ना लोभ ना मोह.. निष्पाप असे!
तिथे एकाच फांदीवर सप्तरंगी फुले बहरतात म्हणे,
एकाच ओट्यावर नादब्रह्म नांदतो म्हणे....
त्या काळोखविरही जगात,
अनंत मायेची, अखंड करुणेची नांदी आहे म्हणे!!
तिथल्या असंक्ख्य झोपाळ्यावर झुलतात म्हणे असंख्य झोके,
तिथले माळरान अमर्याद... फक्त पंख पसरून उत्तुंग झेप घ्यायला.
तिथे म्हणे अनुकंपेचा निर्मोह झरा सदैव खळखतो,
त्या झऱ्यात तहान भागून, पसरते फक्त उपकाराची चादर.. सर्वदूर!
छे छे!! असलं मिथ्या जग तुझ्यात असेल तरी का रे अस्तित्वात?
आणि असलं तरी फारच नगण्य असेल..
म्हणजे तुझ्या आत कुठेतरी एक बिंदू,
त्या बिंदूच्या भोवती एक छोटी पोकळी,
आणि त्या पोकळीमध्ये हे अनघ असं जग!... बस इतकं छोटं!!!
