अडीच अक्षरे प्रेमाची
अडीच अक्षरे प्रेमाची
मनात जळते उरात पोळते
विरह व्यथा मला छळते,
भाषा डोळ्यातील भावफुलांची
तुला कशी ना कळते ||
भंगलेल्या मुक्या मनाच्या
वेदना मी साहिल्या ,
कठोर तुझ्या हृदयाच्या
भावना ना हेलावल्या ||
अजुनी जाळते जीवास माझ्या
विरहाच्या या झळा ,
करपून गेला आयुष्याचा
तुझ्या प्रेमावाचूनी मळा ||
वाट पाहुनी शिणली ग या
डोळ्यांची पापणी ,
येशील कुठल्या क्षणी म्हणोनी
जागतो रात्रंदिनी ||
आशेवरती अजून जगतो
करू नकोस निराशा ,
तुझ्या रुपाने फिरून हसावी
अंगणात या उषा ||
तोड आता सारी बंधने
वाढली उरात या स्पंदने ,
कसं सांगू तुला साजणे
झाले मुश्कील माझे जीणे ||
अडीच अक्षरे प्रेमाची
करती किमया स्नेहाची ,
जाण ठेव डोळ्यातील भावफुलांची
परतूनी ये शपथ तुला प्रेमाची ||

