अभिजात मातृभाषा
अभिजात मातृभाषा
एक आई जन्मदात्री
एक माउली मराठी
भाषा सहज सुंदर
जसे हरिनाम ओठी ||१||
माझी माय साजतसे
लेउनीया अंगावरती
अनुप्रास अलंकार
वाक्यप्रचारांचे मोती ||२||
नाम सर्वनाम आणि
म्हणी समर्पक अति
वाक्य-विचार, समास
तिची शोभा वाढवती ||३||
भारतात लक्ष भाषा
तोड नाही मराठीते
आजी संस्कृत मानाने
ओटी आईची भरते ||४||
ज्ञानेश्वर रामदास
थोर कवने रचिति
तुकाराम अभंगात
मराठीचे गुण गाती ||५||
अभिजात भाषा माझी
असे मला अभिमान
देते वचन सर्वथा
वाढवीन तुझा मान ||६||