आठवणींची खिडकी
आठवणींची खिडकी
धूसर पडदा आठवणींचा
डोळ्यांवरती धरू लागतो.
दाटून येतो ढग सयींचा
जलधारांतून बरसू लागतो.
बालपणीचा काळ सुखाचा
रांगत येतो डोळ्यांपुढती.
तारुण्याचा रंग गुलाबी
हळूच खुलतो गालावरती.
संसारातील उनपाऊस
खेळ खेळतो डोळ्यांमधूनी.
सुखदुःखाचा लेखाजोखा
शोधू लागतो सुरकुत्यांतूनी.
बसून आहे खुर्चीवरती
डुगडुगणारी मान सावरत.
आठवणींची एकेक खिडकी
थरथरत्या हाताने उघडत.
आयुष्याच्या संध्याकाळी
ती पण वेडी कुरकुरते आहे.
तरी मनाच्या पटलावरती
तृप्तीची रांगोळी रेखते आहे.

