आला श्रावण आला श्रावण
आला श्रावण आला श्रावण
सुष्टी नाचते बांधुनी पैंजण
आला श्रावण, आला श्रावण
इंद्रधनुचे नभास तोरण...
आला श्रावण, आला श्रावण
उड्या मारिती अवखळ निर्झर ,
झाली राने हरित-ओलसर
खग हर्षाने करिती गुंजन...
आला श्रावण, आला श्रावण
क्षणात सर सर सरी बरसल्या
आणिक क्षणात गायब झाल्या
क्षणात उन्हाने केले औक्षण...
आला श्रावण, आला श्रावण
नववधुपरी धरती सजली
तृप्त तृप्त होऊनिया भिजली
हिरवाईने नटले अंगण...
आला श्रावण, आला श्रावण
तृण पात्यांवर डौलत बसली
फुले गुलाबी, पिवळी, जांभळी
कुणी रंगांची केली उधळण...?
आला श्रावण, आला श्रावण
सृजनाचा हा काळ सुखावह
सुरू असा हा लावण्योत्सव
आली मज बघ तुझी आठवण...
आला श्रावण, आला श्रावण
