STORYMIRROR

Prakash Patil

Others

3  

Prakash Patil

Others

Ghost Online घोस्ट ऑनलाईन

Ghost Online घोस्ट ऑनलाईन

8 mins
27K


रात्रीची वेळ. दिवाणखान्यातल्या मोठया घड्याळ्याच्या लंबकाची टिक टिक शांततेला छेदून जात होती. तशातच बाराचे टोले पडले. त्या टाण टाण आवाजाने रीमा उगीचच दचकली. गेल्या काही रात्री तिचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. जराही आवाज झाला तरी ती दचकून उठत होती. झोप येत नव्हती म्हणून ती फेसबुक वर बसली होती. सहजच ऑन लाईन लिस्ट खालीवर करता करता ती डोळे विस्फारून पहातच राहिली… तिचे हात थरथरू लागले… तिचा मृत पती अजय ऑनलाईन होता.

"Hi..झोपली नाहीस अजून?" ती अशी पाहत असतांनाच FB मेसेंजर वर त्याचा मेसेज उमटला.

तिचे हातपाय लटपटायला लागले. तिच्या हातातला स्मार्टफोन हलू लागला. "कोण आहे?" ऊसनं अवसान आणून तिने मेसेज टाईप केला.

"माझ्या आयडी वरून अजून कोण मेसेज करणार? मी तुझा पती अजय...मी आलो आहे....गेट बाहेर उभा आहे.. आता आत येतोय..." पुन्हा मेसेज आला… आणि पुढच्याच क्षणी तिला मेन गेट खोलण्याचा आवाज आला. तिने वॉचमनला इंटरकॉम वरून फोन लावला, तर रिंग वाजली नाही, रिसीव्हर उचलून ठेवला असावा. ती कान टवकारून बाहेरच्या हालचालींचा अंदाज घेऊ लागली. काही मिनिटात तिला बाहेर बुटांचा आवाज ऐकू आला. कुणीतरी दरवाजा जवळ येत होतं. वॉचमन कुठे बेपत्ता आहे नेमका याच वेळेला, या विचाराने ती अजून बेचैन झाली. तोच "ट्रिंगssss sssss" दरवाजावरची बेल वाजली. ती जीव मुठीत धरून बसली होती. कुणीतरी बेलचं बटन दाबून धरल्यामुळे बेल वाजतच राहिली होती, आणि कर्कशपणे कानातून आत शिरून तिच्या हृदयाचा थरकाप उडवीत होती. बेल थांबली. काही वेळाने हॉलच्या फ्रेंच विंडो बाहेर कसलीशी हालचाल झाली. तिने दचकून पाहिलं. तिला काळोखात त्याची आकृती दिसली, ती किंचाळली. तिने डोळे गच्च मिटून घेतले. तिला शुद्ध हरपल्यासारखे वाटले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सतीश बंगल्याच्या वॉचमन बरोबर हुज्जत घालीत होता.

 "साहेब, बारा वाजता तर मी इथेच गेटवर उभा होतो!"

"तर मग तो माणूस गेट खोलून आत आलाच कसा?"

"साहेब, मेन गेट ला मी रात्री अकरा वाजताच कुलूप लावतो, कुणी आत जाणारच कसे? रात्री कोणीच आलं नाही....काल रात्री पण मी कुलूप लावलं होतं ते सकाळी सहा वाजता स्वतःच्या हातानं उघडलं."

वॉचमनचे स्पष्टीकरण ऐकून सतीश विचारात पडला. तो तडक बंगल्याच्या दिशेने चालू लागला. त्याने बेलचे बटन दाबले. त्याची बेल वाजवण्याची पद्धत रीमाला माहीत होती. तिने लगबगीने येऊन दरवाजा उघडला.

"सतीश, मला खूप भीती वाटते. रात्रभर मी जवळ जवळ बेहोशीतच होते."

"मी वॉचमनला चांगलं फैलावर घेतलं होतं. पण तो तर छातीठोक पणे सांगतोय, त्याने कुणाला आत येतांना पाहिलं नाही, आणि त्याने गेटला लॉक लावलं होतं, सकाळी पाच वाजता खोललं.. मला वाटतं, तुला भास झाला असावा."

"सतीश, कितीतरी वेळ बेल वाजत होती. मला तो विंडो बाहेर काचे मागे उभा असलेला दिसला, हा भास नव्हता.. आणि फेसबुक वरचा मेसेज? तोही भास वाटतोय तुला?"

तिने मोबाईल हातात घेतला, फेसबुकवरचा मेसेज त्याला दाखवण्यासाठी ती स्मार्टफोनमध्ये पाहू लागली तर काय! मेसेज गायब! अजय कडून आलेलेही आणि तिने टाईप केलेला मेसेजही!
"अरे हे काय! मेसेज मी नाही डिलिट केले...मग आपोआप कसे गायब झाले!"

"मी म्हट्लं ना, तुला भास झाला असेल, म्हणून!" स्मार्ट फोन हातात घेत तो म्हणाला, आणि चक्रावून गेला. डोळे फाडून तो पहात होता. मोबाइलच्या स्क्रीनवर नवीन मेसेज उमटला होता.

"Hi... ते मेसेज आपोआप delete झाले.. आता हा मेसेज दाखव, तुझा यार आला आहे, त्याला! लक्षात ठेव, मी तुम्हा दोघांना नीट जगू देणार नाही. छळून छळून मारणार!"

तिने आधी त्याच्याकडे, मग स्मार्टफोन कडे पाहिले. मेसेज वाचून ती गर्भगळीत झाली.
"बघ सतीश, आता सांग मला भास झाले होते?" केविलवाणी होत तिने विचारलं.

तो निरुत्तर झाला. "काही कळत नाही, हा काय प्रकार आहे. कुणी तुझं अकॉउंट हॅक तर केलं नसेल?"
"ठीक आहे, हॅक केलं असेल, तर आता तू इथे आहेस हे हॅकरला कसं कळलं? आणि रात्री गेट बंद असतांना काय तो हॅकर भुतासारखा आत आला?" ती चिडचीडी होऊन विचारत होती.

तो पुन्हा निरुत्तर झाला. त्याचे डोके भणभणायला लागले. "आपण पोलिसांत तक्रार करू या का?" त्याने विचारले.

"नको, ते अजून उलट प्रश्न करून हैराण करतील. गेले दोन दिवस किती ताप दिलाय त्यांनी."

"मग करायचं तरी काय?"

“तू इथेच थांब, मला एकटीला भीती वाटते."

"ठीक आहे, थांबतो! खरं म्हणजे पोलिसांना आपल्या दोघांवर संशय असतांना मी इथे थांबणे ठीक नाही. पण तू इतकी घाबरतेस तर आज थांबतो मी." तो असे म्हणत असतांनाच तिच्या फेसबुकवर पुन्हा मेसेज आला, "आज रात्री पुन्हा येतोय मी...bye"

तिने थरथरत त्याला दाखवला.

"घाबरू नकोस, मी आहे ना!" तो तिला धीर देत म्हणाला. पण तो स्वतःच आतून घाबरलेला होता.
"सतीश, अजय जिवंत तर नसेल?"

"मूर्ख आहेस का, आपण त्याचं प्रेत घोडबंदरच्या पुलावरून खाडीत ढकलून दिलं आहे ना...आणि पुन्हा पुन्हा त्याच्या मृत्यूचा विषय काढू नकोस.." असे म्हणत तो फ्रेश व्हायला आत गेला.

रात्र झाली. अकरा वाजून गेले होते. बेड मध्ये दोघेही एकमेकांच्या मिठीत होते. पण कोणत्याही क्षणी तो येईल या भीतीने दोघेही जीव मुठीत धरून होते. फेसबुकवर मेसेज येईल म्हणून तिने फोन स्विच ऑफ ठेवला होता. बाराचे टोले पडले. बाहेरचे गेट उघडल्याचा आवाज आला. पाठोपाठ बुटांचा आवाज आला. दोघेही एकमेकांना आधार देत उभे होते तोच फ्रेंच विंडो मध्ये आवाज झाला. त्यांनी त्या दिशेला पाहिले, एक हाडांचा सापळा काचेला टेकून उभा राहिला होता. दरवाजा जोर जोरात हलू लागला. तो हिम्मत करून दरवाजा उघडण्यासाठी जाऊ पहात होता, पण तिने त्याला पकडून ठेवले. जाऊ दिले नाही. त्याने वॉचमनला इंटरकॉम वरून फोन लावला, तर रिंग वाजली नाही, रिसीव्हर उचलून ठेवला होता.

"च्! वॉचमनला फोन लागत नाही, बाहेरचे सी सी टीव्ही कॅमेरेही आपण काढून ठेवलेत!"
हळू हळू हालचाल थांबली. त्या दोघांनी सुटकेचा श्वास सोडला. तिने भीत भीत विंडीकडे पाहिलं. तिथला हाडांचा सापळा गायब झाला होता.

त्याने पुन्हा वॉचमनला फोन लावला. "बोला साहेब!" पलिकडून वॉचमनचा आवाज आला.
"मूर्खां, रिसिव्हर उचलून बाजूला कशाला ठेवला होता?" त्याने चिडून विचारले.
"काय साहेब, रिसिव्हर जाग्यावरच होता. आता रींग वाजली आणि लगेच उचलला मी!"
"बरं बरं, आता थोड्या वेळापूर्वी कोण आलं-गेलं गेट मधून, तू कुठे होतास?"
"साहेब, मी इथेच बसलोय, चुना मळत! आनं कोण येणार-जाणार! गेटला कुलूप आहे!"
त्याच्या या उत्तराने सतीश अजून हैराण झाला. डोके पकडून बसून राहिला. त्या दोघांनीं विचार करून करून रात्र जागूनच काढली.

सकाळी नाश्ता करत असतांना गेट खोलण्याचा आवाज आला. दरवाजा बाहेर हालचाल झाली. दरवाजावरची बेल वाजली. दोघांनीं एकमेकांकडे पाहिलं. तिने जाऊन दरवाजा उघडला. दरवाजात पोलिसांची टीम उभी होती.

"चला!" क्राईम ब्रँच एसीपी समीर सावंत यांच्या आवाजातली जरबच अशी होती, की ती दोघं निमूटपणे त्यांच्या जवळ येऊन उभी राहिली. "पण.." काहीतरी बोलण्यासाठी सतीशने तोंड उघडलं. "तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते पोलीस स्टेशनला" पोलीस निरीक्षक दिपक पाटोळेंनी त्याला मधेच थांबवत म्हटलं.

पोलीस स्टेशनला गेल्यावर दीपक पाटोळे सतीशची कॉलर पकडून ओरडले. "काय रे भडव्याss! अजयची बॉडी कुठे लपवून ठेवलेस?"

"मला काही माहित नाही. अजय बेपत्ता आहे!"

तो असं म्हणताच पाटोळेंनी त्याच्या कमरेत लाथ घातली. तो कळवळला.

"तुम्ही असं नाही करू शकत. तुम्हाला शोध लागत नाही म्हणून..." तो असं म्हणत असतांनाच त्याचा पोटात पाटोळेंची दुसरी लाथ बसली. तो पुन्हा कळवळला.

"लाव रे तो पेन ड्राईव्ह साऊंड बॉक्सला" हवालदाराला पाटोळेंनी फार्मावलं.

त्यांचं कालचं हॉल मधलं संभाषण स्पीकर वर सुरु झालं.

"बोल, एकतर सी सी टीव्ही फुटेज, डिव्हीआर कुठे लपवून ठेवला आहेस ते, आणि अजयला कसं मारलं तुम्ही ते!" त्याच्या डोळ्यांत रोखून पहात पाटोळें ओरडले. "...आणि हो, बॉडीचा शोध घ्यायला आमचं पथक रवाना झालंय..."

आता मात्र आपण पूर्णपणे अडकलो गेलोय हे समजून सतीश गळून पडला. पोपटा सारखा बोलायला लागला.


"आम्ही ऑफिस मध्ये एकत्र काम करीत होतो. रीमाचं लग्न झालेलं आहे हे मला माहीत होतं, पण रीमा काम करता करता माझ्याशी लगट करायची. मी ही तिच्याकडे आकर्षित झालो होतो. अधे मध्ये अजय कॉनफ्रन्ससाठी बाहेर गावी गेला की मी तिच्याकडे जायचो. त्या दिवशी अजय दोन दिवसांसाठी बँगलोरला जाणार असे कळले. तो संध्याकाळी सात वाजता घरून निघाल्या नंतर रीमा ने मला फोन केला. मी तिच्या बंगल्यावर पोहचलो. त्या दिवशी वॉचमन आला नव्हता. तिने मला थांबायचा आग्रह केला. रात्री आम्ही एकमेकांसोबत बेडरूम मधे असतांनाच डोअरबेल वाजली. आमची धावपळ उडाली. आम्ही स्क्रीनवर पाहिले. अजय आला होता. मला काहीच सुचत नव्हते. रीमाची ही तारांबळ उडाली. तिने मला किचन मध्ये लपवले. अजय आत आला, पण रीमाचा अवतार पाहून त्याला संशय आला. शिवाय तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्याच्या लक्षात आले. त्याने तिला किचन मधून पाणी आणायला सांगितले. रीमा किचन मधे आली तेव्हा कोण आले म्हणून मी दचकलो. माझा धक्का एका मोठ्या भांड्याला लागून ते खाली पडले. मोठा आवाज झाला. रीमा ने घाबरून किचनचा लाइट लावला, आणि नेमका त्याच वेळी आवाज ऐकून अजय तिथे आला. मला पाहिल्यावर तो माझ्या अंगावर धावून आला. त्याने किचनमधला मोठा सुरा हातात घेतला. आमची झटापट झाली. माझ्या हाताला सुरा लागला. पण मी त्याचे हात पिरगाळत सूरा खेचून घेतला, आणि त्याच्या पोटात खुपसला. पुन्हा पोटातून खेचून त्याच्या छातीत वार केले. तो खाली कोसळला. काही वेळ त्याच्या निपचित शरीराजवळ आम्ही उभेच होतो. नंतर आम्ही त्याचे मृत शरीर कारच्या डिकीत कोंबले आणि घोडबंदरच्या पुलावरून खाडीत ढकलून दिले. त्यानंतर दोन दिवसांनी रीमाने मिसिंगची complaint दिली. तो बंगलोरला गेला तिथून आलाच नाही अशी!'"


सतीशचं बोलणं संपता संपताच एक लेडी सब इन्स्पेक्टर  रीमाला घेऊन आली.

"साहेब हिने गुन्हा कबूल केला आहे"

"गुड" पोलीस निरीक्षक पाटोळे तिच्याकडे पहात म्हणाले.

पुन्हा सतीश कडे नजर फिरवत ते म्हणाले, "अजय बंगलोरला गेलाच नाही हे आम्ही flight record वरून चेक केले होते. शिवाय त्याच्या मोबाइलचे लास्ट लोकेशन घरचेच होते. आम्ही बंगल्याच्या वॉचमनला विश्वासात घेऊन बंगल्यात मायक्रो फोन लपवून ठेवला होता, ज्यामध्ये एक सिमकार्ड होते. त्यामुले बंगल्यातले संभाषण आम्ही लाईव्ह ऐकू शकत होतो. वॉचमनच्या मदतीने आम्ही अजय सारखी अंग काठी असलेल्या इसमाला अजयचे भूत बनवून पाठवले होते...आणि आता राहिला प्रश्न तो तुमच्या FB अकौंटचा. आम्ही एका हॅकरच्या मदतीने तुमचा पासवर्ड हॅक करून मेसेज पाठवले, डिलिट केले. चला, तुमच्या पापांचा घडा आता भरला आहे."

पोलीस निरीक्षक पाटोळेंचे बोलणे संपते न संपते तोच अचानक झटापट झाली. लेडीज पोलीस उपनिरीक्षकाचे पिस्तूल रीमाच्या हातात आले. इतक्या क्षणार्धात हे घडले की कुणाला काही कळले नाही. रीमाच्या डोक्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. तिने तिच्या आयुष्याचा शेवट करून घेतला होता. रक्ताच्या थारोळ्यात तिच्या तडफडणाऱ्या शरीराकडे पहात सतीश चित्र विचित्र हालचाली करू लागला. खदा खदा हसू लागला. त्याच्या हसण्याचा आवाज हळू हळू वाढू लागला. त्याने स्वतःचे कपडे फाडले. तो स्वतःचेच शरीर नखांनी ओरबाडू लागला, इतके की तो रक्तबंबाळ झाला. पोलीस निरीक्षक पाटोळेंनी दोन हवालदारांना खूण केली. त्यांनी त्याला पकडून लॉकअप मध्ये कोंबले."कांबळे, डॉ.विश्वासराव ना फोन करा! त्याला इंजेक्शन देऊन शांत करायची गरज आहे." असे दुसऱ्या एका हवालदाराला म्हणत त्यांनी शांतपणे ए.सी.पी. समीर सावंत ना फोन लावला. "जय हिंद सर! दोघांनीही गुन्हा कबुल केला आहे, पण रीमाने आत्महत्या केली आहे. सब इन्स्पेक्टरचे रीवोल्वर खेचून तिने स्वतःला गोळी झाडली, आणि सतीशला वेड लागले आहे."त्यांनी थोडक्यात ए सी पी समीर सावंत ना ब्रीफिंग केले.

लॉकअप मध्ये सतीशला हात बांधून जखडून ठेवण्यात आले होते. त्याने नखाने ओरबाडलेल्या जागेवरचे रक्त अर्धवट सुकलेले होते. तिथे माशा घोंगावत होत्या. त्याला लॉकअपच्या भिंतीवर अजय दिसत होता. त्याच्या पोटातून, छातीतून रक्त निथळत होते. तर दुसरया कोपऱ्यात रीमा उभी होती. तिचे डोके फुटलेले होते व डोक्यातून रक्ताची धार लागलेली होती. त्याला ती हसत हसत जवळ येताना दिसत होती आणि तो जोराजोरात ओरडत होता.

 


Rate this content
Log in